Banner Top

पूरग्रस्त शेतकऱ्यांकरिता धार्मिक संस्थानी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावी

पेण – संदीप यशवंत मोने (8698779546)

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.  शेतातील उभे पीक आडवे झाले आहे. गोठ्यांतील जनावरे दगावली, घरातील धान्य, बियाणे आणि रोजच्या जगण्याची साधनसामग्री पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाली. काही गावं तर अक्षरशः उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्र राज्यात सुमारे 45 लाख शेतकरी आहेत शेती हा त्यांचा एकमेव आधार असल्याने, लाखो शेतकरी कुटुंबे आज उपजीविकेच्या मोठ्या संकटात सापडली आहेत. अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांवरतीच आज उपासमारीची वेळ आली आहे.

अशा वेळी केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. शासन यंत्रणेचे प्रयत्न मर्यादित असतात आणि मदत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे समाजातील इतर घटकांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशात मंदिरे, मठ, गुरुद्वारे, दरगाह, चर्च व इतर असंख्य धार्मिक संस्था आहेत. या संस्था फक्त श्रद्धेचे केंद्र राहू नयेत; तर संकटाच्या काळात लोकजीवन वाचवणारी सामाजिक शक्ती ठरली पाहिजेत.

अनेक धार्मिक संस्थांकडे मोठ्या प्रमाणात दानधर्म, निधी व अन्नधान्य जमा होत असते. तोच निधी आणि साधनसामग्री आज या पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपयोगात आणली गेली, तर काही गावांचे संपूर्ण पुनर्वसन शक्य आहे. धार्मिक संस्थांनी तसेच मठाने पूरग्रस्त गावे दत्तक घेऊन शेतकरी कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे. अशा प्रकारची मदत काही धार्मिक संस्था तसेच सामाजिक संस्था व काही व्यक्ति करीत असतात. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर धार्मिक संस्थांनी व व्यक्तींनी पुढाकार घेऊन या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी. पूरग्रस्त शेतकऱ्यांकरिता तात्पुरता निवारा, औषध उपचार, शेतीसाठी बियाणे, जनावरांसाठी चारा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि महिलांसाठी रोजच्या गरजेच्या वस्तू पुरवल्या, तर ते गाव नव्याने उभारी घेऊ शकतील.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनात शासनाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. आज शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात यातील कमी महत्त्वाच्या योजनांवर तात्पुरती स्थगिती आणून त्यातील निधी थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणे ही काळाची गरज आहे. करदात्यांचा पैसा अखेरीस लोकांच्या कल्याणासाठीच असतो. जर शासनाने स्पष्टपणे सांगितले की — “या वर्षी काही योजना पुढे ढकलून त्यातील निधी थेट राज्यातील पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे” — तर राज्यातील प्रामाणिक करदाते नक्कीच या निर्णयाचे स्वागत करतील. उलट त्यांना समाधान वाटेल की त्यांच्या पैशातून संकटग्रस्त शेतकऱ्यांचे आयुष्य वाचवले जात आहे.

आपल्या धार्मिक संस्कृतीत “परोपकार” हाच खरा धर्म मानला गेला आहे. मंदिरे केवळ पूजा, आरती, भजनापुरती मर्यादित राहू नयेत; तर तेथे जमणाऱ्या भक्तीशक्तीचे रूपांतर लोकशक्तीत झाले पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी सेवा आहे. प्रत्येक भक्ताने जर ‘मी जे अर्पण करतो ते आता गरजू शेतकऱ्यांसाठी वापरले जावे’ अशी श्रद्धा ठेवली, तर या कार्यात मोठी उभारी येऊ शकते. आपण सर्वांनी सामाजिक जाणीव ठेवून आपापल्या परीने आर्थिक मदत करावी. आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने राज्यातील पूरग्रस्त गावे नव्याने फुलू लागतील तसेच शेतकऱ्यांचे दुःख काही प्रमाणात का होईना कमी होईल.

चला, आपण सगळे मिळून या आपत्तीला संधी मानूया आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊया.

“शेतकरी वाचला तरच देश वाचेल .”