नागरीकांशी नाळ जोडण्यासाठी पोलीस अधिक्षक रायगड आँचल दलाल गरब्याच्या रंगात…..
पेण – ( सुनिल पाटील )
रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर लोखंडी मुठ ठेवणाऱ्या, डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी पेण येथील श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नागरीक आणि पोलिस प्रशासन यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात जिल्हा दौरा काढून नागरीकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.पेण विभागात सामान्य माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी गर्दीचे ठिकाण शोधले. पेण येथे जागृत देवस्थान असलेल्या श्री अंबिका माता मंदिरात आरतीसाठी शहतील महिला व पुरुषांसह तरुणवर्ग हजेरी लावतो. त्यानुसार रात्री ८.३० च्या दरम्यान जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल मंदिरात पोहचून जनतेसोबत चर्चा केली. तसेच तुमचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी माझे दालन खुले असल्याचे त्यांनी सांगतिले. यावेळी त्यांच्या सोबत पेण विभागीय पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकुल, पेण पोलिस निरीक्षक संदिप बागुल,जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक नीलेश राजपूत उपस्थित होते.श्री अंबिका मंदिरात गरब्यासाठी श्री अंबिका मंदिर ट्रस्ट तर्फे रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना आग्रह केल्यानंतर कडक शिस्त आणि जबाबदारीचे ओझे जपणाऱ्या या अधिकारी जेव्हा या उत्सवात स्वतः उतरल्या तेव्हा उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रायगडकरांसाठी आदर्श ठरत असलेल्या या महिला अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की खाकी म्हणजे फक्त कायदा आणि सुव्यवस्था यांचीच अंमलबजावणीच नाही तर जनतेशी मनाने जोडलेली ताकदही आहे! यावेळी श्री अंबिका मंदिर तर्फे शा.बाबुलाल साखळचंद जैन, शा.जयंतीलाल साखळचंद जैन,शा.राहुल बाबुलाल जैन,शा.चिराग दिनेशकुमार जैन,शा.यश मनोज जैन या जैन बंधू तर्फे अधीक्षक आँचल दलाल यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी पेण शहरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.











