मनोज जरांगे पाटील यांच्या मोहिमेच्या समर्थनार्थ उलवेच्या उन्नती सोसायटीचा एक शिदोरी आरक्षणाची उपक्रम
मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सत्तर किलोमीटर पर्यत पायी चालणाऱ्या कुणबी मराठा बांधवामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघत आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यातून मराठा आंदोलनकर्ते दाखल होत आहे. कुणबी मराठा दाखल्याच्या नोंदी प्राप्त असूनही सरकारकडून दाखले देण्यास होत असलेली दिरंगाई आता टिकेचा विषय बनत आहे.. पायी चालत असलेल्या कुणबी मराठा बांधवासोबत दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी आता पुणे लोणावळा करुन मुंबईच्या दिशेने कुच करत आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चालत असलेल्या तीन कोटी समाजबांधवाना मदतीसाठी आता अवघा मुंबईकर एकवटल्याचे चित्र दिसत आहे. याच अनुषंगाने नवी मुंबईतील उलवे येथील श्री गणेश सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित यांच्या उन्नती सोसायटीतील सर्व रहिवाशांनी खारीचा वाटा देण्याचे नियोजन पुर्णत्वास नेले आहे. आंदोलकांसाठी भाकरी, चटणी आणि पाणी बॉटलचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला सर्व बिल्डिंगच्या रहिवाशांनी उत्स्फुर्त प्रतिसाद शिदोरी जमा केली आहे..
उन्नती सोसायटीचे संतोष जाधव, मोहन पांडुळे, विजय ढाली, धनंजय जाधव, संतोष घाडगे, बाबाजी कोकाटे, दिक्षांत माने, शहाजी घोरपडे यांनी जनजागृती करत शिधा जमामोहिम सुरु केली होती. दरम्यान जरांगे पाटील यांच्या या पदयात्रा मोहिमेसोबत असणाऱ्या समाजबांधवासाठी यापुढेही असेच उपक्रम सुरु ठेवणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.