पेण – विनायक पाटील
“आयुष्मान भव: अभियान हा एक व्यापक देशव्यापी आरोग्य सेवा उपक्रम असून, आरोग्य सेवांना देशातील प्रत्येक गाव आणि शहरापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे पेण मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी आयुष्यमान भव: मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
“आयुष्यमान भवः मोहिमेचा शुभारंभ ऑनलाईन पध्दतीने देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु याच्या हस्ते करण्यात आला. पेण तालुका स्तरावर उपजिल्हा रुग्णालय पेण येथे पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर संध्यादेवी राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा खेडेकर(पवार), श्रीकांत पाटील यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दिप प्रज्वलन व गणपती बाप्पाच्या पुजेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्पणा खेडेकर यानी केले. त्यानी आयुष्यमान भव: या मोहिमे बाबत माहिती देताना सांगितले की, शयरोग आणि कृष्ठरोग समूल नष्ट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी ठरवले आहे. त्यानुसार आयुष्यमान भव या पंधरवडयात क्षयरोग, कृष्ठरोग, स्वच्छता, रक्तदान, अवयव दान, या बाबत मोठया प्रमाणात काम केले जाणार आहे. हा पंधरवडा १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. पेण तालुक्यात १९३ क्षयरोग रुग्ण असून या रुग्णाना दत्तक योजनेवर निशक मित्रांकडे सुपूर्त केले आहे. आरसीएफ कडून १५० रुग्णांसाठी अन्नाचे पॅकेज पुरवले जात आहेत. तसेच ४० निशक मित्र हे आरोग्य खात्यातील काम करत आहेत. २०२५ पर्यंत क्षय आणि कुष्ठ रोग मुक्त भारत करण्याचे लक्ष असून क्षयरोग आणि कृष्ठरोग लपवून ठेउ नये. त्याची माहिती आरोग्य खात्याला दिल्यास त्यावर त्वरीत उपचार करून रुग्णाला बरा करता येईल. सिकलसेल रुग्णांची देखील तपासणी केली जाणार आहे. भविष्यात होणाऱ्या बाळाला कोणताही त्रास होणार नाही तसेच बाळ मृत्यु होणार नाही. यासह अनेक उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ देशमुख यानी आपले मनोगत व्यक्त करताना, २० क्षयरोग रुग्णाची अन पॅकेज पुरवण्याची जबाबदारी घेतली. तर पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यानी त्यांच्या खात्या मार्फत उरलेल्या रुग्णाची जबाबदारी घेणार असल्याचे सागीतले.
सरकारी दवाखान्यात काम करण्यासाठी डॉक्टर पुढे येत नसल्याची खंत आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केली. तसेच आयुष्यमान भवः पंधरवड्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अवयवदानाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.