Banner Top
Monday, July 7, 2025

अभिनेत्री श्रद्धा पोतदारची विशेष उपस्थिती

पेण-दि.8

पेण तालुक्यातील विठाबाई गोविंदा पथक खारपालेने वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळातर्फे पहिल्यांदाच ग्रामीण भागातील जोहे-तांबडशेत येथे आयोजित केलेल्या 1 लाख 11 हजार 111 रोख रुपयांची दहीहंडी सात थर लावून फोडली. सदर स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता. तर हमरापूर विभागातील वेगवेगळ्या गावांतील 11 स्थानिक संघ सहभागी झाले होते. गणेशमूर्ती साठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या हमरापूर विभागात या वर्षी पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.

वैकुंठ पाटील मित्र मंडळाने १,११,१११/, (एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये) ची भव्यदिव्य दहीहंडी स्पर्धा जोहे-तांबडशेत गावात आयोजित केली होती. उरण, पनवेल, अलिबाग, पेण तालुक्यातील चार खुल्या गटातील गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता तर ओम साई महिला गोविंदा पथक कळवे या महिलांच्या पथकाने पाच थर लावून सुंदर प्रदर्शन केले. तसेच तालुक्यातील हमरापूर विभागातील सर्व गावातील 11 गोविंदा पथकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. बालमित्र गोविंदा पथक गडब, विठाबाई गोविंदा पथक खारपाले, द्रोणगिरी साई गोविंदा पथक करंजा उरण, वाघेश्र्वर गोविंदा पथक पिरकोन पनवेल या चार गोविंदा पथकांनी सात थर लावून सलामी दिली. तर उर्वरित सर्व पथकांनी तीन थर लावून सलामी दिल्या. शहरात दर वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते, मात्र ग्रामीण भागात पहिल्यांदाच लाखाची दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामुळे हा साहसी खेळ पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिकांना एकच गर्दी केली होती.

या स्पर्धेवेळी माजी सैनिक, क्रीडा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या अनेक मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. झी मराठीवरील तू चाल पुढं कार्यक्रमातील अभिनेत्री श्रद्धा पोतदार हिने विशेष उपस्थिती लावून आपल्या मनमोहक अदांनी उपस्थितांची मने जिंकली.

सदर स्पर्धेला पेणचे आमदार रविशेठ पाटील, माजी जिप सदस्या कौसल्या पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी, शर्मिला पाटील, भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाटील, सुरेश पाटील, दिनेश पाटील, वडखळ सरपंच राजेश मोकल, डोलवी सरपंच परशुराम म्हात्रे, संजय डंगर, रमेश पाटील, अमित महाराज, स्वप्नील पाटील, गोपीनाथ मोकल, भरत पाटील, सुर्यहास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सदर दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेचे सुत्रसंचालन सुभाष टेंबे, परमेश पाटील यांनी केले.

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE