मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय अस्वस्थ आहे. कोण कुठे प्रवेश करेल आणि कोण कोणासोबत युती करेल याबाबत कोणीच ठाम राहू शकत नाही, अशाच बदलत्या राजकारणात आजची बातमी पेणसह उत्तर कोकणासाठी फार मोठी आहे. पेण मतदारसंघातली राजकीय गणिते आता पुन्हा नव्याने बदलणार आहे. आणि याला कारण ठरणार आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आजचा धक्कादायक पक्षप्रवेश !
आज मातोश्रीवर जात पेण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, मिहीर धारकर, माजी नगरसेवक समीर म्हात्रे ह्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. आजपर्यंतच पक्षप्रवेशापेक्षा ही बातमी खुप मोठी आहे.
मुळात धारकर हे नाव ऐकलं की आजही पेण अर्बन बँक घोटाळा हाच शब्द आठवतो अशा परिस्थितीत शिशिर धारकर यांचे उद्धव ठाकरें यानी केलेले स्वागत नक्कीच पचनी पडणार नाही हे वास्तव आहे. एकेकाळी पेण नगरपालिकेवर धारकर घराण्याचे वर्चस्व होते, परंतु पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्यामुळे या वर्चस्वाला धक्का बसला. शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्याचसोबत पेण अर्बन बँक घोटाळ्यातील ते आरोपी होते. ५०० कोटीहून अधिक घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण अर्बन बँकेत अनेक स्थानिक लोकांचा पैसा होता. हा पैसा बँक घोटाळ्यात बुडला. त्यामुळे लोकांमध्ये संतप्त भावना आहे. गेल्या काही वर्षापासून शिशिर धारकर सक्रीय राजकारणापासून दूर होते. आता शिशिर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्याचा किती फायदा ठाकरे गटाला होतो हे पाहणे गरजेचे आहे.
शिंदे यांच्या राजकारणामुळे आता ठाकरेंनी कोकणात शिवसेना वाढीचे नवं आव्हान स्विकारले आहे. एकीकडे महाडच्या स्नेहल जगताप यांच्यानंतर आता पेण मतदारसंघावर शिवसेनेनं लक्ष केंद्रीत केले आहे. पेणचे आमदार रवी पाटील यांच्या निमित्ताने भाजपाला चेहरा मिळाला आहे. भाजपाने संघटनात्मक कामगिरीवरही भर दिला आहे. तर दुसरीकडे शेकापच्या धैर्यशील पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. बदललेल्या राजकीय गणितात भाजप प्रभावशाली असताना, दुसरीकडे शेकाप आणि काँग्रेस गलितगात्र झालेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धारकर यांच्या निमित्ताने पेणमध्ये ताकद मिळणार की त्याचा फटका पेणपासून मुंबईपर्यंत सहन करावा लागणार याचे चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे. पण या सगळ्यात पुन्हा पेण अर्बनच्या घोटाळ्याने डोके वर काढले तर ते आश्चर्य मात्र अजिबात असणार नाही हे ही तेवढंच खरे !