मुंबई विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर केलेल्या सिनेट निवडणुकीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्यामुळे आता राजकारण चांगलच पेट घेऊ लागलय. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनाकडून निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र दहा दिवसाच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार अर्ज भरण्याची शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 ही अंतिम तारीख होती. जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर, 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान निवडणुक स्थगितीमुळे आता राजकारणात ही निवडणूक स्थगिती करण्यामागच्या राजकारणाबद्दल आता तर्क वितर्क सुरु झाले आहेत. मागील काही दिवसांचा आढावा घेतला तर सिनेट निवडणूकीत युवा सेना आणि मनसे विद्यार्थी सेनेने सर्वाधिक पदवीधर मतदान नोंदणी केल्याने या दोन विद्यार्थी संघटनांचेच सिनेट निवडीत प्राबल्य राहणार हे गृहीत होते. दरम्यान शिवसेना -शिंदे गट यांनी मुळ शिवसेनेचा दावा केला तरी प्रत्यक्षात त्यांची यंत्रणा या निवडणुकीत मतदार नोंदणीपासून अलिप्त राहिला होता. त्याचवेळी आदित्य ठाकरेंच्या युवासेना, आणि आदित्य ठाकरेंच्या मनविसेचा प्रबळ विरोधक असणाऱ्या, शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला काहीच फायदा होणार नसल्याचं उघड झालं होतं. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसच्या एनएसयूआयची मतदार नोंदणी तुलनेनं कमी राहिली होती. त्यामुळे या निवडणुकांना स्थगिती देण्यामागे काही राजकीय हेतू आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरे, आणि अमित ठाकरे यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केली असताना सिनेट निवडणूक स्थगित करुन या दोन्ही नेत्यांना विरोधाची नवी ताकद मिळालीय एवढं मात्र नक्की !