पेणच्या भोगावती नदीवरील 100 मीटर उच्चस्तरीय पूल व बंधाऱ्याच्या दर्जेदार, वेगवान कामाची शासनाकडून दखल; राजूशेठ पिचीका यांना ‘उत्कृष्ट पूल पुरस्कार 2025-2026.
पेण : ब्रिटिशकालीन स्थापत्याची साक्ष देत अनेक दशके पेणच्या सामाजिक आणि व्यापारी इतिहासाचा भाग राहिलेल्या ‘भुंडा पुला’च्या जागी उभारण्यात आलेल्या आधुनिक उच्चस्तरीय पूल व बंधाऱ्याच्या कामाला आता राज्यस्तरीय गौरव मिळाला आहे. मा. खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रवीशेठ पाटील यांच्या निधीतून तरणखोप-पेण मार्गावरील भोगावती नदीवर सुमारे 100 मीटर लांबीचा उच्चस्तरीय पूल व बंधारा उत्कृष्ट दर्जाने आणि जलद गतीने पूर्ण केल्याबद्दल मे. श्री. रामेश्वर कन्स्ट्रक्शन पेणचे राजूशेठ पिचीका यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘उत्कृष्ट पूल पुरस्कार 2025-2026 प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात 29 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या ‘अभियंता गौरव समारंभा’त हा सन्मान प्रदान करण्यात आला. पेणच्या इतिहासाशी जोडलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या पायाभूत सुविधेच्या कामाची थेट राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने या पुरस्काराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतिहासाचा साक्षीदार ‘भुंडा पूल’
भोगावती नदीवरील जुना भुंडा पूल हा पेणच्या जुन्या भौगोलिक रचनेशी आणि व्यापारी जडणघडणीशी जोडला गेलेला होता. दगडी कमानी, पारंपरिक बांधकाम पद्धती आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या पुलाकडे ब्रिटिशकालीन स्थापत्याचा नमुना म्हणून पाहिले जात असे.
ब्रिटिश राजवटीच्या काळात पेण हे कोकणातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. बंदर, बाजारपेठ आणि आसपासच्या गावांशी होणाऱ्या दळणवळणात भोगावती नदी परिसरातील मार्गांना महत्त्व होते. नदीच्या दोन्ही काठांना जोडणाऱ्या या पुलाने अनेक दशके स्थानिक वाहतूक आणि व्यापारी दळणवळणाचा भार पेलला.
‘भुंडा पूल’ या नावामागे स्थानिक पातळीवर विविध आख्यायिका सांगितल्या जातात. पुलावरील कठड्यांचा अभाव तसेच पूरस्थितीत पाण्याच्या प्रवाहाला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा, अशा प्रकारची त्याची रचना याबाबतही पेणकरांमध्ये अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आठवणी आणि कथा सांगितल्या जातात.
जुन्या पुलाच्या जागी आधुनिक तंत्रज्ञान
काळानुसार वाढलेली वाहतूक, सुरक्षिततेची गरज आणि भविष्यातील दळणवळणाचा विचार करून जुन्या पुलाच्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उच्चस्तरीय पूल उभारण्यात आला. सुमारे 100 मीटर लांबीच्या या नव्या पुलासोबत बंधाऱ्याचेही काम करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या बांधकामात दर्जा, कामाचा वेग, सुरक्षितता आणि तांत्रिक नियोजन यांना प्राधान्य देण्यात आले. विशेषतः अतिवृष्टीच्या काळात नदीच्या पाण्याची पातळी वाढून पुलावरून पाण्याचा प्रवाह गेल्यास पूल आणि बंधाऱ्याच्या संरचनेचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने नियोजन करून बांधकाम करण्यात आले आहे.
राजूशेठ पिचीका यांचा राज्यस्तरीय गौरव
पुलाच्या बांधकामातील गुणवत्तेसह जलद गतीने पूर्ण केल्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली याच कामगिरीच्या आधारे मे. श्री रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजूशेठ पिचीका यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिवेंद्रराजे अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले,राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग उद्योग, उच्च व तंत्रशिक्षण,आदिवासी विकास पर्यटन,मृद व जलसंधारण इंद्रनील अनिता मोहनराव नाईक सार्वजनिक बांधकाम खात्याचे अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मिलिंद म्हैसकर, सचिव सार्वजनिक बांधकाम मा. शरद राजभोज, सचिव रस्ते मा. आबासाहेब नागरगोजे सचिव बांधकाम, मा.चेतन आखरे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ ब्रिजेश दीक्षित सह व्यवस्थापकीय संचालक मा.राजेश निघोट, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सचिव संतोष शेलार, प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव प्रशांत औटी तसेच मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या मुख्य अभियंता मा.प्रज्ञा वाळके अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड तत्कालीन कार्यकारी अभियंता अलिबाग सुखदेवे,पेण उपअभियंता डी. एम. पाटील, शाखा अभियंता भरसाट तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच प्रकाश झावरे लाहिरी पिचीका, लक्ष्मी पिचिका,नेहा झावरे उपस्थित होते.
स्थानिक स्तरावरील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाला राज्य शासनाची कौतुकाची पावती मिळाल्याने पेणच्या विकासाच्या दृष्टीनेही हा गौरव महत्त्वाचा ठरला आहे.
इतिहासापासून विकासाकडे…
कधीकाळी पेणच्या व्यापारी आणि सामाजिक जीवनाचा साक्षीदार असलेला भुंडा पूल आता इतिहासाचा भाग बनला आहे. त्याच ठिकाणी नव्या काळाच्या गरजांनुसार उभारण्यात आलेल्या उच्चस्तरीय पुलाच्या कामाला राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट पूल पुरस्कार’ मिळणे, ही पेणच्या पायाभूत विकासाला मिळालेली मानाची पावती ठरली आहे.या पूल प्रकल्पाला मिळालेला राज्यस्तरीय सन्मान पेणकरांसाठी अभिमानाची बाब ठरला आहे.




























Leave a Reply